Independence Day

आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे कि जो प्रत्येक प्राणिमात्रांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी त्यांच्या एका दोह्यात म्हणतात 'पराधीन सपनेहुं  सुख नाही" म्हणजे स्वप्नांत सुद्धा गुलामगिरीत सुख नाही आहे. आज भारतीय स्वातंत्र्यदिन आहे, ज्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले त्यामुळे स्वातंत्र्यदिना चे एक वेगळे महत्व प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय ते आपल्याला गांधीजी, नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्या सारख्या कित्येक माहितीतल्या आणि अनोळखी स्वातंत्र्यसैनिकांची देणं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा १८५७ च्या पण आधी चालू झाला आणि १९४७ ला पूर्णत्वाला गेला.
आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. स्वातंत्र्यानंतर ३ वर्षात भारताने आपले संविधान डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तैयार केले आणि लागू केले आज आपले संविधान हे संपूर्ण जगासाठी प्रेम, बंधुत्व व ऐक्याचे एक प्रतीक आहे. आज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक समृद्धीच्या उंचीवर पोहोचला आहे. आज जे पण काही समृद्धीचे फळे आपण चाखतो आहे ते काही गेल्या ८/१० वर्षात झालेले नाही तर त्याचे बीज स्वातंत्रोत्तर काळात लावले गेले ज्याचा आता वृक्ष होतो आहे आणि वटवृक्ष व्हायला आजून थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. आज आपल्या शेजारी देशाने पूर्ण जगाला कोरोना दिला तर आज भारत देश हा जगाला त्या रोगावरची लस देतो आहे ह्यापेक्षा सुंदर उदाहरण वसुधैवं कुटुम्बकम् चे काय असू शकेल? आज संपूर्ण जगात मग ते कोरोना वरची लस असो वा संगणक आज्ञावली असो किंवा अन्नधान्य पुरवठादार असो, आज प्रत्येक क्षेत्रात भारत आशेचा किरण बनून सूर्यासारखा चमकत आहे.
पण आज मला हा प्रश्न आहे कि, आज आपण स्वातंत्र्य नक्कीच उपभोगतोय कि  ओरबाडतोय?, आज घराघरात नवीनतम उपकरणे, माणसागणिक वाहने, एकापेक्षा जास्त मोबाईल फोन हाती आली आहेत. सगळ्यांना आपल्या आभासी दुनियेत राहायला आवडते आहे. कुठे काही चुकीचे झाले किंवा दिसले तर ती गोष्ट थांबवण्याऐवजी प्रत्येकाला त्याचे चित्रीकरण करून आपापल्या सोशल मीडिया वर टाकण्यात जास्त रस आहे. आज अनेक जणांची सकाळ हि कधी शिव सकाळ, तर कोणाची भीम सकाळ तर अजून कोणत्या कोणत्या सकाळ होत असतात. आज आपण स्वताला जाती धर्माच्या भिंतीत परत जखडवत चाललो आहे. स्वातंत्र्याच्या गैर फायद्यामुळे कुठे खोपर्डी तर कुठे खैरलांजी तर कुठे उन्नाव घडते आहे. आज प्रत्येक जण प्रत्येक घटनेत जात, धर्म किंवा पंथ शोधात असतो. त्यामुळे मीराबाई चानू किंवा लोवलीना किंवा नीरज चोप्रा ने पदक जिंकले तर आपण सर्वप्रथम त्यांची जात, धर्म शोधतो. नुकतेच गुगल या माहितीच्या आंतरजाला ने हे घोषित केले आहे.
आज नक्कीच देश स्वतंत्र झाला आहे पण आपल्या मानसिकतेचं काय, आज आपली मानसिकता स्वतंत्र आहे कि कोणत्या पार्टीच्या आय टी सेल ला बांधली गेली आहे? आज मी जाती धर्माच्या भिंती पाडण्यापेक्षा जर उंच करत असेल तर मी खरोखर स्वतंत्र आहे ?आज माझी मानसिकता हि सर्व काही सरकारने केले पाहिजे असे आहे, तर खरोखर मी स्वतंत्र आहे?  आज मी स्वतः मध्ये काय बदल केले पाहिजे त्यापेक्षा दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्यात पुढे आहे. आपल्याला खरोखर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या मासिकतेत सकारात्मक बदल घडवावे लागतील आणि जात धर्म किंवा पंथ ह्यांच्यावर येऊन एक भारतीय म्हणून पुढे यावे लागेल. नाहीतर आपले भारतीयत्व फक्त क्रिकेट सामन्यात किंवा देशावरच्य हल्ल्यात फक्त पुढे येईल बाकीच्या वेळी आपण परत जातीधर्माच्या चौखटीत बांधले जाऊ.
आज आपण स्वातंत्र्यदिवसाच्या हीरक मोहत्सवानिमित एक प्रण करूया आणि भारतवर्षाला एका अढळ स्थानावर नेऊया. आपणाला भारतात परत सुवर्णयुग आणायचे असेल तर प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारांपेक्षा कर्तव्याचे पालन करायला हवे. आपण सर्वानी जर हे आचरणात आणले तर आपला भारत देश संपूर्ण जगात एक आर्थिक, सामाजिक आणि लष्करी महासत्ता म्हणून सामोरे येईल.
भारतमाता कि जय....!!!!!
डॉ निलेश आर. बेराड
संचालक,
मेट्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नाशिक